स्वयंसेवकांकडून जागवल्या जाणार शिबिराच्या आठवणी

पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. १४ ते १६ जानेवारी १९८३ असे तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस हजार संघस्वयंसेवकांची उपस्थिती होती. शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे: कात्रजमध्ये आर्थिक वादातून मित्राचा खून

पुणे शहर, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा, संभाजीनगर, मराठवाडा, नाशिक आणि खान्देश या भागातील बावीसशे चाळीस गावांमधून या शिबिरासाठी संघस्वयंसेवक आले होते. शिबिराच्या उभारणीसाठी शेकडो स्वयंसेवक तळजाईच्या पठारावर दोन महिने रात्रंदिवस राबत होते. शिबिराला आलेल्या स्वयंसेवकांसाठी ३६ स्वयंपूर्ण नगरे उभारण्यात आली होती. एका नगरामध्ये एक हजार स्वयंसेवकांची निवास, भोजन व्यवस्था होती, अशी माहिती संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी शुक्रवारी दिली.

संक्रांतीच्या निमित्ताने शिबिराला आलेल्या सर्वांना गुळाच्या पोळ्यांचे भोजन देण्यात आले होते. या गुळाच्या पोळ्या पुण्यातील घराघरांमधून संकलित करण्यात आल्या होत्या. सुमारे पावणेदोन लाख गुळाच्या पोळ्या शहरातून संकलित झाल्या होत्या, असेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. शिबिराची संपूर्ण माहिती देणारी एक चित्रफीत तयार करण्यात आली असून ती समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येत असल्याचे डॉ. दबडघाव यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कोरेगाव पार्क भागात गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या विरोधात ‘मोक्का’

तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह संघाचे अनेक केंद्रिय अधिकारी या शिबिरात उपस्थित होते आणि शिबिरात १४ जानेवारी रोजी झालेल्या मकरसंक्रमण उत्सवाच्या अध्यक्षस्थानी ‘स्वामी’कार रणजित देसाई यांची उपस्थिती होती. डॉ. अरविंद लेले यांनी लिहिलेले ‘हिंदू सारा एक…’ हे गीत या शिबिरात स्वयंसेवकांनी एकसुरात गायले. ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके व्यासपीठावरून गायलेले हे गीत प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी स्वरबद्ध केले होते.

शिबिराची वैशिष्ट्ये
संघाच्या कार्याचे आणि संघाकडून चालवल्या जाणाऱ्या सेवाकार्यांचे दर्शन घडवणारे चारशे चित्रांचे ‘संघदर्शन’ हे प्रदर्शन

शिवधनुष्याच्या आकाराचे प्रवेशद्वार

पृथ्वीच्या आकाराचे आणि त्यावर शेषशाही नागाने फणा धरलेले दोन मजली भव्य व्यासपीठ

हेही वाचा >>>प्रमाणपत्रांअभावी एकाचवेळी दोन पदवी प्रवेशांत अडचणी; उपाययोजना करण्याचे यूजीसीचे निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पस्तीस हजार स्वयंसेवकांची उपस्थिती, समाजाकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि पुणेकरांनी शिबिराला आलेल्या स्वयंसेवकांसाठी मोठ्या प्रेमाने दिलेल्या लाखो गुळाच्या पोळ्या ही या शिबिराची खास वैशिष्ट्य ठरली. या शिबिराने कार्यकत्यांना उत्साह मिळाला. संघकार्याला मोठी गती मिळाली. शिबिराने ‘हिंदू सारा एक…’ हा मंत्र महाराष्ट्राला दिला. –सुरेश उर्फ नाना जाधव, प्रांत संघचालक, रा. स्व. संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत