पुणे : विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा पसार झाला असून, त्याच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. गुजरात सीमेवरून अटक करण्यात आलेल्या चौघांची प्रवासी कोठडी मिळवण्यात आली असून, त्यांना सोमवारी (१५ सप्टेंबर) पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणी शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत बंडूअण्णा आंदेकर (वय ७०,), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), विवाहित मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०), अमन युसुफ पठाण (वय २५), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगु (वय २०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) हा पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

आयुष कोमकर लहान भावाला शिकवणीहून घेऊन ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबत आयुषची आई कल्याणी (वय ३७) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होते. आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून शनिवारी सायंकाळी अटक केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीकर, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकर, त्याची विवाहित मुलगी वृंदावनी, स्वराज, तुषार वाडेकर, तसेच अमन पठाण, यश पाटील यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. आंदेकर याच्या घरातून ७७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, जमीन व्यवहारातील कागदपत्रे, मोटार, करारनामे जप्त करण्यात आले आहेत.

आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील चौघांना गुजरात सीमेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात एक आरोपी फरार असून, त्याचा शाेध घेण्यात येत आहे. आरोपींची गुजरातमधील स्थानिक न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवण्यात आली आहे. आरोपींना सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. – निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा