भोर तालुक्यातील निगडे गावात नदीपात्रात विद्युत पंपाची मोटार सोडत असताना वीजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी घडली. या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर निगडे गावात शोककळा पसरली. अचानक वीजपुरवठा सुरू होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक चौकशीत माहिती मिळाली आहे.

हेही वाचा >>>पुणे: ‘रंगमहोत्सवा’त पाच नाटकांची पर्वणी; वामन केंद्रे यांच्या हस्ते २२ डिसेंबरला उदघाटन

विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४८), सनी विठ्ठल मालुसरे (वय २४), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३५), आनंदा ज्ञानोबा जाधव (वय ५८, सर्व रा. निगडे, ता. भोर, जि. पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, तहसीलदार, महावितरणमधील अधिकारी तसेच राजगड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

भोर तालुक्यातील निगडे गावातील गुंजवणी नदीपात्रालगत शेती आहे. नदीपात्रातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. विद्युत पंपाच्या सहायाने पाणी उचलून शेतात आणले जाते. गुरुवारी (१६ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास विठ्ठल मालुसरे, त्यांचा मुलगा सनी, अमोल, आनंदा अवजड मोटार नदीपात्रात सोडत होते. त्या वेळी वीजुरवठा खंडीत झाला होता. मोटार नदीपात्रात सोडत असताना अचानक वीजपुरवठा सुरळीत झाला. वीजेचा धक्का चौघांना बसला.

हेही वाचा >>>पुणे: पुस्तकांच्या छायांकित प्रतींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई

वीजेचा धक्का बसल्याने चौघे जण पाण्यात कोसळले. त्या वेळी नदीकाठावर असलेल्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला. चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, राजगड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार संग्राम थोपटे, पोपटराव सुके, कुलदीप कोंडे, जीवन कोंडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन मालुसरे आणि जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेमुळे निगडे गावात शोककळा पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नदीपात्रात मोटार सोडताना अचानक वीजपुरवठा सुरू होऊन चौघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.- सचिन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजगड पोलीस ठाणे</p>