आरटीओ अधिकाऱ्यांच्या पुरवणी फिर्यादीनुसार कलमवाढ

पुणे : बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या संचालकांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी कलमवाढ केली आहे. त्यानुसार रॅपिडो कंपनीच्या संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदा बाईक टॅक्सी सेवा पुरविल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रॅपिडो (द रोपन ट्रान्सपोर्शन सर्व्हिसेस प्रा. लि.) या कंपनीच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा, मोटार वाहन कायदा कलम ६६, ९३, १९२ (अ), १४६, १९३, १९७ गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार रॅपिडोचे कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कंपनीस प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना नाकारला होता. परवाना नाकारल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून समाजमाध्यमावर काही मजकूर प्रसारित करण्यात आला होता. रॅपिडो बाईक टॅक्सी ऑनलाइन ॲप बेकायदा असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना होती. खासगी दुचाकी वाहनांना बेकायदा व्यावसायिक वापर करण्यास प्रवृत्त करुन त्या बदल्यात शासनाला कोणताही कर न दिला नाही तसेच शासनाची फसवणूक केल्याची पुरवणी फिर्याद सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी पोलिसांकडे दिली. त्यानुसार रॅपिडो कंपनीचे अधिकारी अरविंद सांका, शंतनू शर्मा यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आल्याचे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.