लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका तरुणाची १८ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण धानोरी भागातील मुंजाबा वस्तीत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. सुरुवातीला तरुणाला चोरट्यांनी ऑनलाइन कामाचे पैसे दिले. चोरट्यांनी परताव्यापोटी पैसे दिल्यानंतर तरुणाचा विश्वास बसला.

आणखी वाचा-स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील, तसेच या व्यवसायात पैसे गुंतविल्यास परतावाही मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाला जाळ्यात ओढले. तरुणाकडून वेळोवेळी १८ लाख ७१ हजार रुपये उकळले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हांडे तपास करत आहेत.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी पुणे शहर परिसरातील तक्रारदारांना आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.