scorecardresearch

गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचारी महिलेसह पतीच्या विरोधात गुन्हा

व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची १९ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यासह पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचारी महिलेसह पतीच्या विरोधात गुन्हा
( संग्रहित छायाचित्र )

पुणे : व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची १९ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यासह पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी ज्योती शंकर गायकवाड (वय ५०) आणि पती शंकर लक्ष्मण गायकवाड (वय ५४, दोघे रा. रास्ता पेठ) यांच्या विरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सदाशिव राजाराम नलावडे (वय ५२, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्योती गायकवाड पोलीस दलात आहेत. नलावडे यांचा मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे. गायकवाड दाम्पत्य ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. गायकवाड दाम्पत्य नलावडे यांच्या गॅरेजमध्ये मोटार दुरस्तीसाठी द्यायचे. त्यामुळे त्यांची नलावडे यांच्याशी ओळख झाली होती. ज्योती गायकवाड यांनी पोलीस आयुक्तालायत नोकरीस असल्याचे सांगितले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी परिचय असल्याचे त्यांनी नलावडे यांना सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी गायकवाड दाम्पत्याने नलावडे यांना व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्यात येईल, असे आमिष त्यांनी दाखविले होते. त्यानंतर नलावडे यांनी त्यांना वेळोवेळी  १९ लाख ५० हजार रुपये दिले होते. गायकवाड दाम्पत्याने व्यवसायासाठी नवीन मोटारी घेण्यात येणार असल्याची बतावणी केली होती. गायकवाड यांनी मोटारी घेतल्या नाहीत. नलावडे यांनी त्यांना परताव्याची मागणी केली. तेव्हा टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नलावडे यांनी पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी नलावडे यांना धनादेश दिले. खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा पैसे टप्याटप्याने परत करतो, असे त्यांनी सांगितले. पैसे परत न केल्याने नलावडे यांनी वकिलांमार्फत गायकवाड यांना नोटीस बजावली. गायकवाड दाम्पत्य घर बंद करुन निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर नलावडे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला. न्यायालयाने गायकवाड दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या