पिंपरी : ट्रेडिंग ॲपमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बावधन परिसरात उघडकीस आला. या प्रकरणात एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला जादा नफ्याचे आमिष दाखवत ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला चांगला परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ४७ लाख ३८ हजार ९३३ रुपये गुंतवण्यास भाग पाडले आणि त्यांच्या आभासी खात्यावर मोठा फायदा झाल्याचे दर्शवले. जेव्हा फिर्यादीने ही रक्कम परत मागितली, तेव्हा त्यांना जमा रकमेवर पाच लाख रुपये कर भरण्यास भाग पाडले. कर भरल्यानंतरही त्यांची रक्कम परत न करता त्यांची ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपये एवढ्या रक्कमेची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
लग्नाच्या आमिषाने २० लाखांची फसवणूक
विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. क्रेडिट कार्ड, कर्ज ॲप आणि बँक ॲपद्वारे महिलेच्या नावावर १९ लाख ८१ हजारांचे कर्ज घेत महिलेची फसवणूक केली. ही घटना १७ नोव्हेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ कालावधीत शिरगाव येथे घडली.
याप्रकरणी महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्नाटक राज्यातील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची आरोपीसोबत विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाली. आरोपीने महिलेला संदेश पाठविले. दूरध्वनी करून ओळख वाढवली. त्यानंतर महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखविले. आरोपीने महिलेच्या क्रेडिट कार्ड, कर्ज ॲप आणि बँक ॲपमधून १९ लाख ८१ हजार ७५१ रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर महिलेसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याने बांबूने मारहाण
दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांनी एका व्यक्तीला लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना भूकूम येथे घडली.याबाबत ४६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापूजीबुवा मंदिर, हिंजवडी टप्पा तीन येथून देवाचे दर्शन घेऊन सायंकाळी घरी जात असताना रस्त्यामध्ये फिर्यादीस एक अनोळखी दुचाकी धक्का मारून जात होती. त्यांनी ‘भाऊ, दुचाकी जरा हळू चालव’ असे सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी भूकूम येथे त्यांना अडवले. दुचाकीवरून खाली उतरून वाद घालून शिवीगाळ केली. आरोपीने लाकडी बांबूने मारहाण करून फिर्यादीचे दोन्ही हात आणि डावा पाय फ्रॅक्चर करून गंभीर जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
म्हाळुंगेत मोटारीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू
म्हाळुंगे, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुळी गावात मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दत्तात्रय पांडुरंग मुंगसे (वय ४९) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार भरधाव वेगाने आणि हयगयीने चालविली. पाठीमागून मुंगसे यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा रोडच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुंगसे यांचा मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.