पुणे : ‘सायकलचा वापर केल्यामुळे केवळ पर्यावरणपूरक प्रवास शक्य होतो असे नाही, तर त्यातून नियमित व्यायामाची सवयही लागते, जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाजासाठी जीवन समर्पित करणारे दत्ताजी आणि वैदेही गायकवाड दाम्पत्य आहे. अशा सेवाभावी वृत्तीच्या लोकांमुळेच समाजाचे संतुलन टिकून आहे,’ असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शनिवारी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि निरामय संस्था यांच्या वतीने नू. म. वि. मुलींची प्रशाला आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या गरजू विद्यार्थिनींना माधुरी मिसाळ यांच्या हस्ते मोफत सायकल वितरण करण्यात आले. त्या वेळी मिसाळ बोलत होत्या. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, सदस्य सतीश पवार, मिहीर प्रभुदेसाई, शाला समिती अध्यक्ष जयंत किराड, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुधीर काळकर, निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले, सचिव ज्योतिकुमार कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
‘सायकल मिळाल्याने मुलींना आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळेल. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. अनेकदा शाळा दूर असल्यामुळे बसची गरज भासते. पण त्याचा खर्च परवडत नाही. वेळ वाया जातो, थकवा येतो. अशा परिस्थितीत सायकल केवळ एक साधन नसून, ती शिक्षणाच्या प्रवासाची एक गुरुकिल्ली आहे,’ असे गायकवाड यांनी सांगितले.
‘सायकलमुळे लांबचा प्रवास सुकर होईल आणि मुलींना नियमितपणे शिक्षणासाठी जाता येईल. हे फक्त वस्तूवाटप नाही, तर शिक्षणात सातत्य राखण्यासाठी केलेला प्रयत्न आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
ॲड. जैन म्हणाले, ‘संस्थेच्या किशोरी शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन होत आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हे शिक्षण प्रसारक मंडळीचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रासाठी जबाबदार आणि सजग नागरिक घडवणे हे खरे ध्येय आहे.’
उमेश भोसले यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका वर्षा गुमास्ते यांनी आभार मानले. दीपाली वाघोलीकर यांनी सूत्रसंचालन केले.
कोट ‘अनेकदा शाळा दूर असल्यामुळे बसची गरज भासते. पण त्याचा खर्च परवडत नाही. वेळ वाया जातो, थकवा येतो. अशा परिस्थितीत सायकल केवळ एक साधन नसून, ती शिक्षणाच्या प्रवासाची एक गुरुकिल्ली आहे.’