पुणे : अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे. बाष्पयुक्त ढग चक्रीवादळाने खेचल्यामुळे राज्यात आणि विशेषकरून तळकोकणात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कुठेही मोसमी पाऊस फारसा सुरू नाही. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर मंदावला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढग चक्रीवादळाकडे खेचले गेल्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा अपेक्षित जोर दिसून येत नाही. त्याचाच परिणाम राज्यातील मोसमी वाऱ्याच्या प्रगतीवर दिसून येत आहे.

हेही वाचा… ‘या’ उपकरणामुळे मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश

हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी हळूहळू पोषक वातावरण तयार होत आहे. १८ ते २१ जून या काळात दक्षिण भारत, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात पाऊस सक्रीय होईल. २३ जूननंतर महाराष्ट्र, मध्य भारतात पाऊस सक्रीय होईल. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

हेही वाचा… मुळशी तालुक्यातील ‘हे’ गाव होणार कार्बनमुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भात उष्णतेची लाट शक्य

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० जूनपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. विदर्भात १६ ते ३० जून या काळात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली, तर सर्वात कमी १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली आहे.