सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी यांच्यातर्फे संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक स्मारक मंदिर येथे तीन दिवस दररोज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या स्वरोत्सवास तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि स्वरवंदना या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
युवा गायिका मृदुला तांबे यांच्यासह आशा खाडिलकर आणि पं. रामदास कामत हे ज्येष्ठ कलाकार पहिल्या दिवशी नाटय़संगीताची बहारदार मैफल सादर करणार आहेत. उत्तरार्धात सुधीर मोघे दिग्दर्शित ‘ज्योत्स्ना..अमृतवर्षिनी’ ही ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन, सतीश व्यास यांचे संतूरवादन, पं. राजा काळे आणि डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन असे कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी होणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी आणि ज्योत्स्ना भोळे यांची कन्या वंदना खांडेकर उपस्थित होत्या.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘संगीत कुलवधू’ नाटकाच्या नव्या संचातील प्रयोगाने स्वरोत्सवाची २३ ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. मो. ग. रांगणेकर लिखित ‘कुलवधू’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला २३ ऑगस्ट रोजी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. हा योग साधून सावनी दातार, श्रीरंग भावे, अनुपम कुलकर्णी, अमृता पटवर्धन, रमा नाडगौडा, चंद्रशेखर कुलकर्णी हे कलाकार हा प्रयोग सादर करणार आहेत.