पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा ३ ते ५ जून या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने देता येणार आहे.
प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन परीक्षेला हजर राहावे.
विद्यार्थ्यांनी त्यांना सोयीस्कर ठिकाणाहून त्यांच्या नोंदणीकृत लॉगिन आयडीने लॉगिन करावे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी फ्रंट कॅमेरा असलेला मोबाईल फोन, लॅपटॉप, पीसी, टॅब, आय-पॅड वापरून ऑनलाइन परीक्षा प्रणालीमध्ये लॉग इन करू शकतात. परीक्षेच्या वेळेत फ्रंट कॅमेरा सुरू ठेवणे आवश्यक आहे. एकदा लॉगइन केल्यानंतर विद्यार्थ्याला दिलेल्या सत्रात परीक्षा पूर्ण करावी लागेल. नकारात्मक गुण पद्धतीची ही परीक्षा १०० गुणांची आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी (एक चतुर्थांश) प्रश्नाच्या दिलेल्या गुणांपैकी वजा केले जातील, असेही विद्यापीठाने नमूद केले आहे.