विकास कोणाचा, शहराचा का बिल्डरांचा का सत्ताधाऱ्यांचा, अशी विचारणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवार (७ जून) पासून पुणे शहराचा विकास आराखडा या विषयावर जनजागृती अभियान सुरू केले जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सुरू होत असलेले हे अभियान १३ जूनपर्यंत चालेल.
मनसेचे अध्यक्ष बाळा शेडगे आणि महापालिकेतील गटनेता वसंत मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्याचा विकास आराखडा प्रकाशित झाला असून २७ जूनपर्यंत नागरिक त्यावर हरकती-सूचना देऊ शकतात. मात्र, तत्पूर्वी पुणेकरांना या आराखडय़ात आपापल्या भागासाठी काय केले आहे, काय करायला हवे होते, कोणता गोष्टी करायला नको होत्या यांची माहिती मनसेतर्फे दिली जाईल. रस्ते, शाळा, क्रीडांगणे, उद्याने आदी सेवा-सुविधांबाबत विकास आराखडय़ात काय हवे याची माहिती मनसे आयोयित चर्चासत्राच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच या वेळी आराखडा, शासकीय नियम वगैरेबाबत प्रोजेक्टरद्वारेही माहिती दिली जाणार असल्याचे शेडगे यांनी सांगितले.
उद्याचे पुणे स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी या अभियानाद्वारे पुणेकरांना हरकती-सूचना नोंदवण्याचे आवाहन केले जाणार आहे. आराखडय़ाची माहिती देण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित करण्यात आलेली चर्चासत्र पुढीलप्रमाणे आहेत. मतदारसंघाचे नाव, वार, दिनांक आणि कार्यक्रमाचे स्थळ या क्रमाने.
कोथरूड मतदार संघ- शुक्रवार (७ जून) स्वामीकृपा हॉल, देसाई बंधू आंबेवाले, पहिला मजला, कर्वे रस्ता. कसबा- शनिवार (८ जून) गोगटे प्रशाला, नारायण पेठ. पर्वती- रविवार (९ जून) सीताराम बिबवे प्रशाला, बिबवेवाडी. कॅन्टोन्मेंट- सोमवार (१० जून) शाहू उद्यान सभागृह, केईएम रुग्णालयासमोर. वडगावशेरी- मंगळवार (११ जून) देवकर सभागृह, येरवडा. हडपसर- बुधवार (१२ जून) लक्ष्मी क्लासिक क्लब, अमर कॉलेज, मगरपट्टा. शिवाजीनगर- गुरुवार (१३ जून) चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी. सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी सहा ते रात्री नऊ अशी आहे.