पुणे : जम्मू काश्मिरमधील शोपियाँ बाजार समितीतून मार्केट यार्डातील फळ व्यापाऱ्याने ई-नामद्वारे सफरचंद आणि पिअरची खरेदी केली. ‘ई-नाम इंटरस्टेट ट्रेड’ अंतर्गत दोन राज्यांतील बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे शेतीमालाची खरेदी-विक्री करता येत आहे. त्यामुळे आंतराज्यीय शेतीमाल खरेदी विक्रीला चालना मिळणार आहे.
जम्मू काश्मिर येथील शोपियाँ बाजार समितीमधुन ई-नामद्वारे येथील मार्केट यार्डातील सफरचंद व्यापारी सुयोग सूर्यकांत झेंडे यांनी सफरचंद आणि पिअर या फळांची नुकतीच खरेदी केली. त्यांनी एकूण ११ टन ६००किलो सफरचंद आणि पिअर खरेदी केली असून, या खरेदीची किंमत ११.७६ लाख रुपये असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाकडून देण्यात आली.
जम्मू काश्मिर येथील सफरचंद, पिअर आणि प्लम अशा फळांची ‘ई-नाम’मार्फत खरेदी करण्यात येते. ऑनलाइन पद्धतीने खरेदी विक्री केल्यास खरेदीदार, तसेच शेतकऱ्यांना फायदा होतो. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पुढाकार घेऊन खरेदी-विक्रीस चालना दिली आहे. ई-नाममुळे जम्मू काश्मिर येथील बाजार समिती आणि पुणे बाजार समितीत सफरचंद, पिअर, प्लम अशा फळांची खरेदीचो व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्मिरप्रमाणे अन्य राज्यातील शेतीमाल ‘ई-नाम’द्वारे खरेदी-विक्रीबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाच्या ‘ई-नाम’द्वारे होणारी विक्रीची रक्कम अडत्यांमार्फत थेट ई-पेमेंटद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीमालाची ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ‘ई-नाम’मुळे व्यापार वाढीस चालना मिळाली आहे. ई-लिलावाद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर, उडीद, कांदा, डाळिंब, कोबी, रेशीमकोष आणि फळांची विक्री होत आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आंतरराज्यीय व्यापारामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. – संजय कदम, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ
२१ हजार ५८२ कोटींची उलाढाल
केंद्र शासनाने शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रासह २३ राज्यातील , तसेच चार केंद्रशासीत प्रदेशातील मिळून देशातील १५२२ बाजार समित्या ई-नामला जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १३३ बाजार समित्या चार टप्यामध्ये जोडल्या आहेत. राज्यात ई-नाम द्वारे एकूण ५७८ लाख क्विंटल शेतीमालाची विक्री झाली असून, विक्री झालेल्या मालाची किंमत २१ हजार ५८२ कोटी रुपये आहे.