शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी घेतलेला प्रवेश विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्यास त्यांना पूर्ण शुल्क परत करावे. कोणत्याही प्रकारच्या शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिले. विशेष बाब म्हणून यंदाच्या वर्षी हा निर्णय घेतल्याचेही युजीसीने स्पष्ट केले.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी युजीसीने परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास शुल्क परताव्याबाबत नमूद करण्यात आले होते. तर यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीचा निकाल लांबल्याने, जेईई मुख्य, जेईई ॲडव्हान्स, सीयूईटी आदी प्रवेश परीक्षा लांबल्याने विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याची सूचना सूचना युजीसीकडून परिपत्रकाद्वारे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यूजीसीने परिपत्रक प्रसिद्ध करून शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या शुल्क परताव्याबाबत स्पष्ट केले.
पालकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३चा प्रवेश 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्यास त्यांना पूर्ण शुल्काचा परतावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास कोणत्याही शुल्काची आकारणी न करता शंभर टक्के शुल्क परत करावे, असे नमूद करण्यात आले आहे.
एक हजार रुपये प्रक्रिया शुल्क
विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०२२पर्यंत प्रवेश रद्द केल्यास उच्च शिक्षण संस्थांनी प्रक्रिया शुल्कापोटी एक हजार रुपये घेऊन उर्वरित शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, असेही स्पष्ट करण्यात आले.