पुणे : आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या एकाची हडपसर पोलिसांनी सहा तासांत सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. प्राजस दीपक पंडित (वय २५, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ परिसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिलाल विश्वकर्मा हे फर्निचर तयार करतात.

गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार ते पाच जण विश्वकर्मा यांच्या घरी आले. फर्निचरचे काम करायचे असल्याचे सांगून हरिलाल यांना घरातून घेऊन गेले. त्यानंतर मध्यरात्री विश्वकर्मा यांचा मुलगा योगेश याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा वडील घाबरलेले होते, अशी माहिती योगेशने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्याानंतर या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली.

हडपसर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

आरोपी कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी प्राजसला पकडले. त्याच्याबरोबर हरिलाल विश्वकर्मा होते. चौकशीत प्राजस आणि साथीदारांनी आर्थिक व्यवहारातून हरिलाल यांचे मांजरी परिसरातून अपहरण केल्याची कबुली दिली.