पुणे : टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळत असल्याने या रस्त्यावरील मिरवणूक शिस्तबद्ध होऊन वेळेत संपण्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने आवश्यक त्या काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त नियुक्त करावा, अशी मागणी नियोजन समितीकडून करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात शहरात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाचे विसर्जन मिरवणूक हे प्रमुख आकर्षण आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी या रस्त्यांसह टिळक चौकात (अलका टाॅकीज चौक) गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या मार्गावरील मिरवणुकीत शहराच्या मध्य भागातील सार्वजनिक मंडळे सहभागी होतात. तर टिळक रस्त्यावर स्वारगेट, बिबवेवाडी, सहकारनगर, पर्वती आणि धनकवडी या भागातील मंडळे सहभागी होतात.

काही मंडळे १९९१ पासून टिळक रस्त्यावरून टिळक चौकात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीलाही विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील मिरवणूक शिस्तबद्ध व्हावी आणि ती वेळेत संपावी, यासाठी या रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक झाली. त्यावेळी मिरवणूक वेळेत संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. नियोजन समितीचे अमित बागुल, गणेश घोष, सागर बागुल, सुधीर ढमाले, उमेश वैद्य, शिरीष मोहिते, उदय जगताप, पुष्कर तुळजापूरकर, वैभव वाघ, प्रशांत थोपटे आणि ऋषिकेश भुजबळ या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वारगेटकडून टिळक रस्त्यावर येणाऱ्या मंडळांना पूरम चौकात मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागते. पूरम चौकात वरिष्ठ पोलीस अधिकारी नसल्याने या अडचणीत वाढ होत आहे. त्यामुळे पूरम चौकात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच, टिळक रस्त्यावर तात्पुरत्या स्वच्छतागृहांचीही वानवा आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात यावी आणि पदाधिकाऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.