श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी उत्सव मंडपात गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे.

उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यातील भगवान शिवाच्या पंचकेदार मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांच्या हस्ते बुधवरी झाला. खासदार गिरीश बापट, माजी आमदार मोहन जीशी या वेळी उपस्थित होते.

असे आहे पंचकेदार मंदिर

प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह पंचकेदार मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंड मधील गढ़वाल येथे स्थित असून शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर म्हणजे पाच सुवर्णी शिखरांचे असून हिमालयातील मंदिर स्थापत्याची प्रतिकृती असेल. गंगा, यमुनोत्री, भागीरथी किंवा गंगा तसेच शिवाच्या अष्टमूर्तींचे प्रतिक असलेले गर्भगृह आणि प्रत्यक्ष शिवाचे वाहन नंदीच्या शिल्पाने आणि अनेक देवता, शिवगणांच्या, सुरसुन्दरींच्या तसेच पशु-पक्ष्यांच्या, लता-वेलींच्या मूर्तीरुप उपस्थितीने श्रीगणरायाचे यंदाचे श्रीपंचकेदार मंदिर, म्हणजे प्रत्यक्ष शिवलोक असेल. श्रीपंचकेदारमंदिर म्हणजे तीर्थ स्थळातील प्रमुख असलेल्या चारधाम यात्रेचे एक प्रमुख मंदिर असून त्या मंदिरसमूहाचे दुर्लभ दर्शन गणेशोत्सवात घडेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १०० फूट लांब, ५० फूट रंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सजावट विभागात ४० कारागीर कार्यरत असून राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने दर्शन घेणे शक्य होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर हे मंदिराचे काम, विद्युतरोषणाईचे काम वाईकर बंधू तर मंडपव्यवस्था काळे मांडववाले करणार आहेत.