पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीत एक धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित सोसायटीत राहणाऱ्या वकिलाला एका टोळक्यानं मारहाण केली आहे. आरोपींनी वकिलासह त्यांचे वडील आणि कामगाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हनुमंत श्रीकांत पाटेकर (वय ३१, रा. कॉलनी नंबर ५, पंत नगर, जाधववाडी, चिखली), सुग्रीव भीमराव गायकवाड (वय ५७, रा. म्हेत्रे गार्डन जवळ, चांदणी चौक, चिखली), विनयकुमार आंबिकाप्रसाद यादव (वय २२, रा. शिंदे वस्ती, रावेत), दिलीप फुलचंद निर्मल (वय ३३, रा. चंदन नगर), शत्रुघ्न सुखदेव पोकळे (वय ३५, रा. फ्लॅट नंबर २, गणेश नगर, वडगाव शेरी) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी ॲड. अमित शहा (वय ४१, रा. आदिनाथ सोसायटी, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी शहा हे वकील असून त्यांची कात्रज येथे प्राणीमित्र संस्था आहे. त्यांनी एका कंपनीकडून चार दुचाकी घेतल्या होत्या. या दुचाकीचे काही पैसे परत करायचे राहिले आहेत. या कारणावरून थकीत हप्ते वसुली करणारे खासगी कंपनीतील आरोपी शहा यांच्या घरात शिरले. शहा यांनी घराचा दरवाजा उघडताच टोळक्यानं त्यांना दमदाटी करायला सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी शहा यांच्या वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दुचाकीची चावी आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यांच्या कामगारालाही जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी त्याच्याकडीलही मोबाइल संच हिसकावून घेतला. या घटनेनंतर आरोपी टोळक्याने वकिलाकडील दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही आरोपींना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक तुषार भोसले, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शिवाजी सरक आदींनी ही कारवाई केली. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.