पुणे : धनकवडी भागात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवून १८ वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने कोयते, दांडकी उगारून दहशत माजविली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रहिवाशांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. शहर परिसरात आठवडाभरात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. हडपसरमधील रामटेकडी, भवानी पेठ, तसेच कोंढवा भागात तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.
धनकवडीतील तोडफोड प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली. धनकवडीत मंगळवारी मध्यरात्री केशव काॅम्प्लेक्स, सरस्वती चौक, तसेच नवनाथनगर भागात टोळके आरडाओरडा करत दुचाकीवरून आले. शिवीगाळ करून टोळक्याने दहशत माजविली.
टोळक्याने रिक्षा, तीन मोटारी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या दोन व्हॅन, एका टेम्पोची तोडफोड केली. आरोपींनी वाहनांवर दगडफेक केली. त्यांच्याकडे कोयते होते. आरोपींना दोन रहिवाशांनी रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण केली. या घटनेत दोघे जण जखमी झाले. त्यांना रहिवाशांनी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत टोळके पसार झाले होते. पोलिसांनी माहिती घेऊन त्यांचा शोध सुरू केला. वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे. नागरिक दहशतीखाली आहेत.
कोंढव्यात दोन दिवसांपूर्वी एका किराणा दुकानात शिरून टोळक्याने हल्ला केला होता. खाद्यपदार्थांची पाकिटे फेकून दिले होते. दुकानासमोर लावलेली रिक्षाची काच फोडण्यात आली होती. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती.
तोडफोडीच्या घटनांमुळे दहशत
गेल्या काही दिवसांत शहरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. औंधमधील विधाते वस्ती परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत टोळक्याने १५ वाहनांची तोडफोड केली होती. शहरात किरकोळ वादातून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. शहरातील उपनगरांत वाहन तोडफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
उपनगरांत किरकोळ वादातून मध्यरात्री वाहनांची तोडफोड केली जाते. कोयते उगारून नागरिकांना शिवीगाळ केली जाते, तसेच घरांवर दगडफेक केली जाते. दहशत माजविणाऱ्या सराइतांविरुद्ध कडक कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे, तसेच मध्यरात्री उपनगरांतील वेगवेगळ्या भागांत गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन