पुणे : गणरायापाठोपाठ रविवारी (३१ ऑगस्ट) आगमन होत असलेल्या माहेरवाशीण गौरींच्या स्वागतासाठी घराघरांमध्ये महिलांची लगबग सुरू झाली आहे. गौरींचे रेखीव, आकर्षक मुखवटे, तसेच सजावट साहित्य आणि वैविध्यपूर्ण अलंकारखरेदीसाठी तुळशीबाग, रविवार पेठेसह मध्यवर्ती पेठांमधील बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.

अनेक घरांमध्ये गणपती आणि गौरी असतात. कुलाचारानुसार गौरी खड्याच्या किंवा मुखवट्याच्या असतात. काहींकडे गौरींचे पितळी मुखवटे, तर काही घरांमध्ये शाडूचे मुखवटे असतात. पितळी मुखवट्यांना पाॅलिश करण्याबरोबरच रंगवून घेतले जात आहेत. ज्यांच्याकडे गणपतीबरोबर गौरींचे मुखवटे विसर्जन करण्याची प्रथा आहे, अशा घरांमध्ये गौरींचे शाडूचे मुखवटे खरेदी केले जातात.

दागिन्यांच्या दुकानांमध्ये गौरींसाठी कुड्या, ठुशी, मोहनमाळ, मंगळसूत्र, मोत्याच्या माळा, नथ, बुगडी, बांगड्या असे अनेक प्रकार उपलब्ध असून, दोनशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या दरांत त्यांची विक्री सुरू आहे. मंगळसूत्रातही विविध प्रकार आहेत. कुंदन, टेम्पल ज्वेलरीला यंदाही मागणी कायम आहे. गौरींसाठी खास डिझायनर साड्याही बाजारात आहेत. अनेक घरांमध्ये नव्या साड्या खरेदी करून गौरीला परिधान करूनच त्याची घडी मोडली जाते. त्यामुळे गौरींसाठी नव्याने साडीखरेदी केली जाते.

मुखवट्यापासून सजावट साहित्य आणि दागिन्यांनी नटलेल्या गौरी अनेकांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यंदाही गौरींचे रेखीव, सुबक मुखवटे विक्रीसाठी ठेवले आहेत. गौरीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवट्यांची किंमत दीड हजार रुपयांपासून पुढे आहे. शाडूचे मुखवटे अडीच हजारांपासून पाच हजारांपर्यंत आहेत. फायबर मूर्तीची किंमत चार हजारांपासून आहे. पितळी मुखवटे मोजक्या दुकानांत मिळतात. सजावट साहित्यामध्ये तोरण, रोषणाईच्या माळा, कुंदनच्या माळा, मखरे, आकर्षक सजावट केलेले चौरंग-झोपाळा, विजेवर चालणारे कारंजे, मखरातले वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.

पारंपरिक दागिन्यांबरोबरच खड्यांच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांना महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. नाजूक बाजूबंद, कंबरपट्टा, नेकलेस, डिझायनर नथ याला मागणी आहे. चांदीवर सोन्याचा मुलामा असलेले दागिनेही मिळतात, अशी माहिती रवींद्र रणधिर यांनी दिली.

कधी करावे गौरी आवाहन

अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होत असते. उद्या रविवारी (३१ ऑगस्ट) सकाळपासून ते सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी गौरी आवाहन करता येईल.  ज्येष्ठा नक्षत्रावर सोमवारी (१ सप्टेंबर) सोमवारी गौरीपूजन करावे. मंगळवारी (२ सप्टेंबर) मूळ नक्षत्र सकाळपासून रात्री ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असल्याने दिवसभरात केव्हाही गौरी विसर्जन करता येईल, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.