पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात कारवाई झालेला गुंड नीलेश घायवळ परदेशात पसार झाल्यानंतर पोलिसांनी घायवळसह त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. घायवळ, त्याचे कुटुंबीय, तसेच त्याच्याशी संबंधित एका कंपनीची दहा बँक खाती पोलिसांनी गाेठविली आहे. या बँक खात्यात ३८ लाख २६ हजार रुपयांची रोकड आढळून आली.

कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ, तसेच साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवले. तो स्वित्झर्लंडमध्ये पसार झाला. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजाविली आहे.

घायवळ, तसेच त्याच्या कुटुंबीयांचे आर्थिक स्रोत पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घायवळ, त्याच्या कुटुंबीयांची दहा बँक खाती गोठविण्याबाबत पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर बँकेकडून नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती नीलेश घायवळ, कुसुम घायवळ आणि पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठविण्यात आली आहे. दहा बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये आढळून आले आहेत. पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या बँक खात्यातून व्यवहार करता येणार नाहीत, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिले.

आडनावात फेरफार करून पारपत्र?

नीलेश घायवळने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पारपत्र मिळविल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. त्याला पारपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.