नोंदणीची प्रक्रिया सुरू; मान्यतेनंतर शेतकऱ्यांना फायदा
वैशिष्टय़पूर्ण प्रजाती असलेल्या उस्मानाबादी शेळीला भौगोलिक उपदर्शन (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेतर्फे या संदर्भातील प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत जीआयसाठीची नोंदणी करण्यात येणार आहे.
जीआय मानांकन हे संबंधित परिसरातील विशिष्ट शेती उत्पादन किंवा वस्तूला दिले जाते. त्या वस्तूच्या किंवा उत्पादनाच्या बौद्धिक संपदा, गुणवत्ता, दर्जा अशा वेगवेगळ्या निकषांनुसार जीआय मानांकन दिले जाते. आतापर्यंत देशभरातील कृषी क्षेत्राशी संबंधित जवळपास १०० उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. या संदर्भातील तांत्रिक कामकाज जीआय-स्वामित्व हक्क नोंदणी तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सहकार्याने करत आहेत.
‘उस्मानाबादी शेळीच्या वेगळेपणाचे निजाम काळापासून अनेक उल्लेख आहेत. त्यामुळे उस्मानाबादी शेळीला जीआय मानांकन मिळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेऊन प्रक्रिया सुरू केली. त्यांच्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी ही प्रक्रिया मार्गी लावली. जीआय मानांकन शेतकऱ्यांच्या बचत गटाच्या नावावर केले जाणार आहे. त्यासाठी बचत गटाची नोंदणी करण्यात येत आहे.,’ असे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी सांगितले.
गरज का?
उस्मानाबादी शेळी एका वेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देते, तिचे मांस चवदार असते. राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र प्रजाती म्हणूनही या शेळीची नोंद आहे. आता उस्मानाबादी शेळीला जीआय मानांकन मिळणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी आणि देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाले होते. आता उस्मानाबादी शेळीला जीआय मानांकन मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शेळीला जीआय मानांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
उस्मानाबादी शेळीला गरिबांची गाय म्हणतात. जीआय मानांकनासाठीचे प्रथमदर्शनी अहवाल तयार करण्यात आले आहेत. अन्य तांत्रिक प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करून जीआय मानांकन मिळण्यासाठी अर्ज करण्यात येईल. जीआय मानांकन मिळणे शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरेल. – प्रा. गणेश हिंगमिरे,जीआय-स्वामित्व हक्क तज्ज्ञ