पुणे : जागतिक हवामान संघटनेने (वर्ल्ड मीटरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन) येत्या काही महिन्यांत एल निनो मुळे जागतिक स्तरावर तापमानवाढीचे संकट घोंघावत असल्याचा इशारा दिला आहे. सलग तीन वर्ष राहिलेल्या ला निनाच्या प्रभावानंतर आता एल निनो विकसित होण्याची शक्यता बळावली असून त्याचा परिणाम म्हणून तापमानवाढ शक्य असल्याचे संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

एल निनो सक्रिय झाल्यास त्याचा परिणाम जगभर तापमानाच्या पाऱ्यावर तसेच त्याही पुढे जाऊन पावसाच्या प्रमाणावर होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकत्याच वर्तवलेल्या मार्च महिन्याच्या अंदाजामध्ये मार्च ते मे महिना तापमानवाढीचा तसेच उष्णतेच्या लाटांचा ठरणार असल्याचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचा हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. एल निनो विकसित होण्याची शक्यता वर्षांच्या पहिल्या सहामाहीमध्ये कमी असते. एप्रिल ते जूनमध्ये ती सुमारे १५ टक्के, तर मे ते जुलै दरम्यान ती ३५ टक्के पर्यंत वाढते, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीसाठी वर्तवण्यात आलेला अंदाज पाहता एल निनो विकसित होण्याची शक्यता ५५ टक्क्यांपर्यंत आहे, मात्र मध्ये येणाऱ्या संभाव्य वातावरणीय अडथळय़ांचा परिणाम होऊन ही परिस्थिती बदलणेही शक्य आहे, असे हवामान संघटनेने आपल्या अंदाजात नमूद केले आहे. एल निनो आणि हवामान बदलांच्या परिणामांतून संपूर्ण जगासाठी २०१६ हे आजपर्यंत नोंदवण्यात आलेले सर्वात उष्ण वर्ष असल्याचे या वेळी जागतिक हवामान संघटनेने सांगितले असून आगामी काळात २०२६ हे त्याच कारणांमुळे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यताही या वेळी वर्तवण्यात आली आहे.

भीती नको – डॉ. रंजन केळकर

भारतातील र्नैऋत्य मोसमी पावसावर एल निनो परिणाम करेल का अशा चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी एल निनोच्या प्रभावाबाबत आत्ताच काही भाष्य करणे हे भीती निर्माण करणारे ठरेल असे नुकतेच ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले होते. एल निनो जेवढय़ा वेळा सक्रिय झाले त्यांपैकी सुमारे निम्म्या वेळा एल निनो हे भारतातील र्नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक ठरले. ला निना हे नेहमीच भारतातील पर्जन्यमानासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या एप्रिल महिन्यातील मान्सून अंदाजाची प्रतीक्षा करणेच योग्य असल्याचे डॉ. केळकर यांनी स्पष्ट केले.