पुणे : शासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील लोकांसाठी काम करता येते. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार सरकारला असतात. त्यामुळे सर्वाधिक बदल घडवायचा तर राजकारणात जाण्याचा पर्याय आहे. तसेच बदल घडवण्यासाठी आधी मतदान केले पाहिजे, असा सल्ला सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी तरुणांना दिला.
सिम्बायोसिसतर्फे विश्वभवन सभागृहात फेस्टिवल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमालेअंतर्गत ‘द चेंज मेकर’ या विषयावर मुंढे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: मेळावा ‘शिवस्वराज्य’ यात्रेचा; चर्चा अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याची
मुंढे म्हणाले, की चांगले करण्यासाठी जैसे थे परिस्थितीला प्रश्न विचारले पाहिजेत. पण केवळ प्रश्न विचारून पुरेसे होत नाही. तर त्याचे उत्तर शोधणे, ते साध्य होईपर्यंत काम करत राहणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यापासून काहीच झाले नाही, असा सिनिकल विचार समाजात दिसतो. पण त्या बदलाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची लोकसेवक म्हणून शासकीय धोरणाची अंमलबजावणी, जनतेला सेवा देणे ही जबाबदारी आहे. पण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी, भूमिका निभावतो का हा प्रश्न आहे. केवळ मतदान करून नागरिकांची जबाबदारी संपत नाही. प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकही सरकारचाच भाग आहेत. नागरिक म्हणून धाडस दाखवले नाही तर परिस्थिती बदलणार नाही. बदलाबाबत केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. समाज, देश, मजबूत होण्यासाठी आधी स्वतःला मजबूत केले पाहिजे.
जास्तीत जास्त तीन वेळा प्रयत्न…
अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षांमध्ये आठ-दहा वर्षे प्रयत्न करताना दिसतात. हा वेळेचा, उर्जेचा अपव्यय आहे. समाजात योगदान देण्यासाठी अन्य मार्गही आहेत. खासगी क्षेत्रात काम करूनही समाजासाठी योगदान देता येऊ शकते. पूर्ण एकाग्रतेने जास्तीत जास्त तीनच प्रयत्न केले पाहिजेत. पैसे मिळवण्यासाठी प्रशासकीय सेवा हा मार्ग नाही, असेही त्यांनी नमूद केले.