पुणे : गोवा-पुणे विमान प्रवासात एका प्रवाशाला शीतपेय प्यायल्यानंतर अचानक त्रास व्हायला लागला. घशात खवखव होऊन पोटातही दुखू लागले. त्या शीतपेयात धातूचे तुकडे असल्याचा दावा प्रवासी आणि सहकाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली.

संबंधित प्रवाशावर विमानातच प्राथमिक उपचार करता येतील का, यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले; परंतु विमानात कुणी डॉक्टर प्रवासी नसल्याने पुणे विमानतळावर उतरताच उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमान कंपनीकडून उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला असून, प्रवाशाची प्रकृती आता स्थिर आहे.गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी सकाळी पुण्याकडे येत असलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या मागणीनुसार त्याला डबाबंद शीतपेय देण्यात आले.

प्रवाशाने त्याचे सेवन केल्यानंतर घशाला टोचल्याची जाणीव झाली. त्यामुळे शीतपेय तपासले असता, त्यामध्ये धातूचे तुकडे आढळून आल्याचा दावा प्रवाशाने केला. त्यामुळेच घशातून रक्तस्राव सुरू झाल्याचाही दावा त्याने केला. ‘सोबतच्या प्रवाशांमध्ये डाॅक्टर नसल्याने तातडीने पुणे विमानतळावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या गेल्या. विमानतळावर विमान पोहोचताच प्रवाशाला विमानतळावरील वैद्यकीय पथकाने तपासले आणि जवळच्या रुग्णालयात पाठविले,’ अशी माहिती विमान कंपनीकडून देण्यात आली.

‘रुग्णालयात प्रवाशाच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत कोणताही बाह्य घटक आढळला नाही. डॉक्टरांनी ‘एन्डोस्कोपी’चा सल्ला दिला. परंतु, प्रवाशाने तो नाकारला. सायंकाळी या प्रवाशाला रुग्णालयातून सुखरूप सोडण्यात आले. संबंधित कंपनीने या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे,’ असे कंपनीकडून सांगण्यात आले.

तपास सुरू

विमान कंपनीच्या मानक कार्यप्रणालीनुसार, पेय-शीतपेयाच्या तपासणीसाठी संबंधित डबा ताब्यात घेतला आहे. तसेच, प्रवाशाला पुरावे नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ दिला. कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास सुरू केला आहे, असेही स्पष्टीकरण विमान कंपनीकडून देण्यात आले.