पुणे : आखाड महिन्यात सामीष खवय्यांकडून बेत रचले जातात. आखाड महिन्यात चिकन, मटण, मासळीला मागणी वाढलेली असून  चोरट्यांनी भोर तालुक्यातील  एका शेतकऱ्याचे शेतातून सात शेळ्या आणि बोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पद्माबाई मारुती गाडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ परिसरात गाडे यांची शेती आहे. शेतात शेड असून तेथे गाडे यांनी शेळ्या, बोकड बांधून ठेवला होता. मध्यरात्री चोरटे गाडे यांच्या शेतात शिरले. शेडमध्ये बांधलेल्या  गावरान जातीच्या सात शेळ्या आणि एक बोकड चोरट्यांनी लांबविला. शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या आणि बोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर गाडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शेळ्या, बोकड चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.