लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सराफ व्यावसायिकांनी दागिने घडविण्यासाठी दिलेले पावणेदोन कोटींचे शुद्ध सोने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांकडून पश्चिम बंगालमधील पाच कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद मिथून शेख उर्फ अँटीक, राहुल, शमीम, सनी शेख, राजीव शेख (सर्व मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी गु्न्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. जमीर इब्राहिम शेख (वय ४५, रा. ११६२, कसबा पेठ) यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जमीर शेख यांचा दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. शेख यांची गणेश पेठेत झेड ज्वेलर्स अँड एंटरप्रायजेस पेढी आहे. शेख यांच्या पेढीत अमीन व्यवस्थापक आहे. शेख यांच्या पेढीत सराफ बाजारातील सराफ व्यावसायिक दागिने घडविण्यासाठी शुद्ध सोने देतात.

आणखी वाचा-पुणे : नगर रस्त्यावर डंपरची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दागिने घडविण्यासाठी देण्यात आलेले सोने तिजोरीत ठेवण्यात येते. शेख यांच्या पेढीत आरोपी मोहम्मद शेख गेल्या काही वर्षांपासून दागिने घडवून देण्याचे काम करत असल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. शेख, व्यवस्थापक अमीन आणि मोहम्मद यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या होत्या. तिजोरीत ठेवण्यात आलेले चार हजार ५०० ग्रॅम सोने चोरून मोहम्मद आणि त्याचे नातेवाईक पसार झाले. शनिवारी तिजोरीतील सोने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंत तक्रारादार शेख यांनी विचारपूस केली. तेव्हा कारागीर मोहम्मद आणि त्याचे नातेवाईक पसार झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.