पुणे : बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपींनी काळेपडळ, चंदननगर, पर्वती, आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार गुन्ह्यांचा छडा लावला. आरोपींकडून तीन लाखांची रोकड, एक लाख रुपयांचे मोबाइल संच, तसेच बनावट दागिने असा आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रोहित संजय गोरे (वय ३०,रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८), ओम सुंदर खरात (वय २३, दोघे रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. आराेपींना बनावट सोन्याचे दागिने पुरविणाऱ्या मुंबईतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सराफ व्यावसायिकांकडे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून फसवणुकीचे प्रकार वाढले होते.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून करण्यात येत होता. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, बाळासाहेब सकटे गस्त घालत होते. शहरातील सराफ व्यावसायिकांकडे सोन्याचे बनावट दागिने गहाण ठेवून त्यांची फसवणूक करण्याऱ्या टोळीतील काही जण वाघोली भागात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना खबऱ्याने दिली. पोलिसांनी सापळा लावून गोरे, पवार, खरात यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी बनावट सोन्याचे गहाण ठेवून शहरातील चार सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याची कबुली दिली.
आरोपींनी अशा पद्धतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आणखी काही सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण आणि पथकाने ही कामगिरी केली.
दागिन्यांना सोन्याचा मुलामा
आरोपी राेहित गोरे या टाेळीचा म्होरक्या आहे. तिघा आरोपींनी मुंबईतील दोघांकडून बनावट सोन्याचे दागिने आणले होते. हे दागिने शंभर टक्के बनावट नसतात. त्याला सोन्याचा मुलामा देण्यात येतो. अशा बनावट दागिन्यांवर ‘हाॅलमार्क’ असल्याने सराफी व्यावसायिकांना सोने तारण ठेवताना संशय यायचा नाही. आरोपी सोने तारण ठेवून पैसे घेत हाेते. बनावट दागिन्यांची टंच काढल्यानंतर ते बनावट असल्याचे उघडकीस यायचे. पैसे मिळाल्यानंतर आरोपी पुन्हा दागिने सोडविण्यासाठी सराफी पेढीत यायचे नाहीत. दागिने बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर सराफ व्यावसायिक पोलिसांकडे तक्रार देणार नाहीत, असा समज आरोपींचा होता. आरोपींनी अशा पद्धतीने सराफांची फसवणूक केल्यानंतर पोलिसांकडे तक्रार येण्यास सुरूवात झाली. दागिन्यांवर ट्रेडमार्क आणि हाॅलमार्क आढळून आल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.