शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची भोसरीत जाहीर सभा होती. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत ते सभास्थानी पोहोचू न शकल्याने त्यांना भाषण करता आले नाही. परिणामी, ते आले आणि भाषण न करता उपस्थित नागरिकांना विजयाचे चिन्ह दाखवत ते निघूनही गेले.
भोसरीच्या गावजत्रा मैदानात सायंकाळी मुंडे यांची सभा होती, मात्र एकाच दिवशी वेगवेगळय़ा मतदारसंघांत त्यांच्या लागोपाठ सभा असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. बारामतीतील महादेव जानकर यांच्या प्रचाराची सभा उरकून ते निघाले. त्यानंतर त्यांनी हडपसरला व खडकवासल्याची सभा घेतली. रात्री पावणेदहापर्यंत भोसरीत पोहोचतो, असा निरोप त्यांनी धाडला. प्रत्यक्षात वाहतूककोंडीमुळे ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यांनी प्रवासात मोबाइलवरून भोसरीत जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी केलेला दूरध्वनी माईकसमोर ठेवण्यात आला. देशात नरेंद्र मोदींचे सरकार येणार असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. सभेच्या ठिकाणी ते रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचले. तथापि, आचारसंहितेनुसार रात्री दहानंतर भाषण करता येत नसल्याने त्यांनी भाषण केले नाही. मात्र, व्यासपीठावर येऊन मोठय़ा संख्येने जमलेल्या नागरिकांना त्यांनी हातवारे करूनच आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले.