पुणे : सरकारी योजनांचे दरवाजे भटके विमुक्तांना खुले झाले असून, त्याचाच एक भाग म्हणून सिकलीकर वैदू आणि मांगगारुडी समाजातील ५५० नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भटक्या विमुक्त समाजातील नागरिक सरकारी योजनांपासून दूर आहेत. पाठीवर बिऱ्हाड आणि हातावर पोट असलेल्या या नागरिकांना त्यांचाच ठावठिकाणा माहिती नसतो. त्यामुळे सरकारी कागदपत्रांच्या जाचक नियमापासून ते दूरच असतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद आणि भारतीय सिकलीकर संघटना प्रयत्नशील आहेत. नुकतेच त्यांनी सिकलीकर वैदू आणि मांगगारुडी समाजातील ५५० नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वाटप केले.

राजे उमाजी नाईक महाराज स्वाभिमान योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. या वेळी हडपसरचे मंडलाधिकारी शेखर शिंदे, परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य शुभांगी तांबट, परिषदेचे हितरक्षा प्रमुख डॉ. जितेंद्र ठाकूर, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते अभिजित बोराटे, सिकलीकर संघटनेचे अध्यक्ष चांदसिंग कल्याणी, माजी नगरसेवक मारुती तुपे, गुरुद्वारा गुरुनानक दरबार साहिबचे प्रधान चरणजिंत सिंग सहानी, डॉ. जितेंद्र ठाकुर, पालावरची शाळांच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजातील होतकरू आणि दुर्लक्षित घटकाला जातीचे दाखले उपलब्ध केल्याबद्दल चांदसिंग कल्याणी यांनी प्रशासनाचे आभार मानले. संघटनेचे शक्तिसिंग कल्याणी यांनी येणाऱ्या काळामध्ये जातीच्या दाखल्यांचा फायदा कसा होईल, याची माहिती दिली.शुभांगी तांबट यांनी आपल्या मनोगतातून परिषदेच्या कामाची माहिती दिली.