पुणे : मानवी वस्तीवरील वावर आणि निरपराध माणसांवरील हल्ल्यांना पायबंद घालण्याच्या उद्देशातून बिबट्यांना आता जंगलामध्येच भक्ष्य देण्यात येणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी सांगितले. शेळ्या आणि बकऱ्या खरेदी करून त्यांना जंगलात सोडून देण्याचा प्रयोग यापूर्वी अशोककुमार खडसे यांनी राबविला होता, असेही त्यांनी सांगितले.बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षावर युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असून त्यासंदर्भात गणेश नाईक यांनी पुण्यात वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नाईक बोलत होते.

नाईक म्हणाले, ‘बिबट्यासारख्या वन्यप्राण्याने हल्ला केल्यानंतर माणूस दगावला तर त्याच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे हे हल्ले होऊच नयेत यासाठी वनविभागाने बकऱ्या, शेळ्या खरेदी करून त्यांना जंगलात सोडले तर बिबटे भक्ष्याचा शोध घेण्यासाठी मानवी वस्तीमध्ये येणारच नाहीत. गावात जसे देवाला बैल सोडतात आणि तो देवाचा नंदी आहे असे सांगतात, तसे या देवाला शेळ्या-बकऱ्या सोडल्या आहेत असे लोकांना सांगायचे म्हणजे त्यांची चोरी होणार नाही.‘

‘शहरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या ध्यानात घेता  बकऱ्यांऐवजी त्यांना जंगलात सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो का?’ असे विचारले असता ‘प्राणीमित्रांचा याला विरोध होऊ शकतो. त्यामुळे हे शक्यच नाही’, असे स्पष्ट केले.

केवळ जुन्नर परिक्षेत्रापुरतीच बिबट्याच्या नसबंदीला परवानगी

बिबट्यांचा माणसावरील हल्ला आणि बिबट्यांची वाढती संख्या यावर उपाययोजना म्हणून त्यांची नसबंदी करण्याला केंद्राने काही अटींसह परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ जुन्नर परिक्षेत्रापुरतीच मर्यादित असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

‘जुन्नर आणि शिरूर तालुक्यात ८२ ठिकाणच्या जागा पूर्वी ओसाड होत्या, परंतु दोन धरणं आणि मुबलक पाणी आल्याने तेथील ऊस क्षेत्र, भाजीपाला आणि जंगल परिक्षेत्र वाढल्याने बिबट्यांची संख्याही वेगाने वाढली. जंगल भागात भक्ष्य मिळेनासे झाल्यामुळे बिबट्यांनी आता मानवी वस्तीत शिरकाव सुरू केला आहे. या भागात सुमारे दीड हजार बिबटे आहेत’, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

‘बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एआय नियंत्रित आलार्म कॅमेरे, लोखंडी काट्यांचे कॉलर सौर आणि विद्युत कुंपण यांसह अनेक उपाययोजना सध्या सुरू आहेत. पण, मु‌ळात त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा उपाय केला जाणार आहे’, असे नाईक म्हणाले.

‘बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे उपलब्ध आहेत. त्यामध्ये आणखी एक हजार पिंजऱ्यांची भर पडणार आहे. पकडलेल्या बिबट्यांना ‘वनतारा’मध्ये पाठवले जाणार आहे. परंतु त्यांच्याकडेही किती बिबटे पाठवायचे याला मर्यादा आहेत. आफ्रिकेसारख्या देशांमध्ये चित्ते आहेत. परंतु बिबटे नाहीत. त्यामुळे त्यांनीही बिबट्यांची मागणी केली आहे. तेथेही ते पाठवण्याबाबत विचार सुरू आहे’, असे नाईक यांनी नमूद केले.

नाशिक परिसरातही नुकताच एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता. नियोजित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तेथेही बिबट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. एकूणच बंदोबस्तासाठी ११ कोटी रुपये खर्चून यंत्रणा उभारली जाणार आहे. अशीच यंत्रणा अहिल्यानगर आणि नाशिक येथेही उभारली जाणार असून, कुंभमेळ्यात येणारे भाविक सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तो विषय असेल आणि नाशिकला पालकमंत्री नाही. परंतु कुंभमेण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे ते यात लक्ष घालतील, असेही नाईक यांनी नमूद केले.

‘वनविभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. बऱ्याच काळापासून भरतीही झालेली नाही’, याकडे लक्ष वेधले असता गणेश नाईक म्हणाले, ‘कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरण्याला माझा विरोध राहील. यासाठी बाँड पद्धतीने मनुष्यबळाची भरती करणे मला योग्य वाटते. हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर कार्यवाही होईल.’

प्रवक्ते उत्तर देतील

महायुतीत असूनही गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार रवींद्र धंगेकर हे भाजपच्या विरोधात बोलत आहेत या विषयी विचारले असता ‘या विषयावर  आमचे प्रवक्ते उत्तर देतील’, असे नाईक यांनी सांगितले.