पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आज पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सत्कार करत असताना चक्क स्टेजवरच एका महिलेचा मास्क त्यांनी खेचला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये हशा तर पिकलाच पण या घटनेची मोठी चर्चाही होऊ लागली आहे. याच घटनेवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातल्या करोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या नव्या योजनांची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसंच कोश्यारी यांच्या या कृतीबद्दल प्रतिक्रियाही दिली. पवार म्हणाले, राज्यपाल महामहिम आहेत. त्यांनी काही केलं तर त्यावर मी बोलू शकत नाही.त्यांनी शपथ देताना आम्हाला मास्क काढायला सांगितला तर काढावाच लागेल.

काय आहे प्रकरण? येथे वाचा…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. मात्र त्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला.

यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.तर दुसर्‍या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याने,यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.