‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांच्या नव्हे, तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते, परंतु दलित चळवळ ब्राह्मणविरोधी झाली आणि तिने ब्राह्मण्य स्वीकारले. मराठा पुढाऱ्यांनी याचा फायदा घेतला. महार समाजाच्या खांद्यावर बंदुका ठेवून त्यांनी त्या बंदुकांचे तोंड ब्राह्मणांकडे वळवले आणि ब्राह्मण चीतपट केले. ब्राह्मण समाजात प्रागतिक विचार करणारे तरुण व नेते आहेत. प्रागतिक चळवळीला ओहोटी लागण्याचे एक कारण म्हणजे आपण स्वीकारलेला ब्राह्मणद्वेष होय,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. दलित व प्रागतिक चळवळी एकत्र आल्या तरच आपण शासनावर दबाव आणू शकू आणि कॉ. पानसरे यांच्या खुन्यांना शोधू शकू, असेही ते म्हणाले.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या चाहत्यांतर्फे कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर यांना कसबे यांच्या हस्ते बुधवारी ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करुन गौरवण्यात आले, या वेळी कसबे बोलत होते. पंचवीस हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मुक्ता मनोहर यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानसाठी कॉ. शांताबाई रानडे यांच्या हाती सुपूर्द केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, मीना खवळे, प्रकाश चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
कसबे म्हणाले, ‘व्यापक परिवर्तनाची चळवळ करणे सोडून प्रत्येक जण जे-जे मिळेल ते मिळवण्याच्या खटपटीस लागला. दलितांची व स्त्रियांची चळवळ आणि प्रागतिक चळवळ एकत्र आली तरच आपण शासनावर दबाव आणू शकू. आता ती वेळ आली आहे, नाहीतर सगळे आधुनिक गुलाम ठरतील. गौतम बुद्ध, महात्मा फुले, कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये जग कसे असावे याची प्रेरणा आहे.’
मुक्ता मनोहर म्हणाल्या, ‘लोकशाहीच्या ‘फार्स’ला पार करुन दिवसाढवळ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्यासारखी माणसे दिवसाढवळ्या मारली जातात याबद्दल व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ही वेळ आहे. लोकशाही यंत्रणा व न्यायव्यवस्था कुणाच्या हितसंबंधातून काम करते हे बघायला हवे.’
‘भालचंद्र नेमाडे हे दुसऱ्यांना शिव्या देत मोठे झालेले विचारवंत’
‘विचारवंत ही जमात घाबरट आणि ‘कॉर्पोरेट’चे गुलाम झाली आहे. ते सांगतील तीच भाषा हे विचारवंत बोलत असल्यामुळे हे विचारवंत चाचपडत व दोन अर्थ निघतील असे बोलतात,’ असे सांगून रावसाहेब कसबे म्हणाले, ‘साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे याचा उत्तम नमुना आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने ‘या देशातील जाती मोडल्या तर देश मोडेल’ असे विधान करणे हा ज्ञानाचा अपमान आहे. काही व्यक्ती स्वकर्तृत्वाने तर काही दुसऱ्यांना शिव्या देत मोठय़ा होतात. त्यातले एक नेमाडे आहेत.’