पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा उभारणीचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळा उभारणीचे काम ऑक्टाेबरअखेर पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील अडीच एकर जागा महापालिकेला दिली आहे. या जागेवर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या दिल्ली येथील कारखान्यात तयार केलेले संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कांस्य धातूचे सुटे भाग उभारणीच्या ठिकाणी आणून प्रत्यक्ष पुतळा उभा केला जात आहे. आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

म्युरल उभारणार

पुतळ्याभोवती आकर्षक ध्वनी आणि विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मुख्य प्रसंगांवर आधारित म्युरल उभारले जाणार आहेत. संभाजी महाराज यांच्या जीवनावरील, तसेच ऐतिहासिक साहित्य आणि शस्त्रांचे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. ॲम्फी थिएटर, सुशोभीकरण, रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित कलाकृती साकारण्यात येणार आहेत. सुबक कलाकुसरीची सजावटही केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

‘एआर’ आणि ‘व्हीआर’ तंत्रज्ञानाचा वापर

स्मारकाच्या परिसरात ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट उलगडण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध ऐतिहासिक घटना, त्यांचे बुद्धिकौशल्य, मृत्यूपूर्व जीवनसंघर्ष, त्यांची धर्मनिष्ठा, मुघलांविरुद्ध लढाई, त्याग आदी बाबींचा अधिक जिवंतपणे अनुभव घेण्यासाठी ‘व्हीआर’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

रविवारी मानवंदना

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला रविवारी मानवंदना दिली जाणार आहे. तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशेहून अधिक भगवे ध्वज असणार आहेत, अशी माहिती हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभर फूट उंचीच्या पुतळ्यामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. दर्शनी भागात असल्याने चारही बाजूंनी पुतळा दृष्टीस पडणार आहे. त्यामुळे शहराच्या पर्यटनास चालना मिळेल. – देवन्ना गट्टूवार, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.