बारामती : बारामती शहरात रविवारी झालेल्या भीषण अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३६) आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली सई (वय १०) आणि मधुरा (वय ४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक दु:खद घटना घडली आहे. मुलगा आणि नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. या घटनेमुळे आचार्य कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. ओंकार आचार्य हे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते. वडिलांसाठी फळे घेण्यासाठी खंडोबानगर येथील चौकात थांबले होते. शाळेतून मुलगी सईला घेऊन परतताना डंपरच्या धडकेत दुचाकीखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून, बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. ते महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते. मात्र, मुलगा आणि नातींच्या अकाली मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. सोमवारी त्यांचे निधन झाले. आचार्य यांच्यामागे पत्नी शैलजा, मुलगा अमोल आणि सून अरुणा हे आहेत. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.