विस्तारित मेट्रो मार्ग, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, दोन वर्तुळाकार रस्ते, पुणे-नाशिक आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गिका, राष्ट्रीय व राज्य महामार्ग असे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी हजारो हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. या जमिनीच्या मोबदल्यात जमीन मालकांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. अचानक बँक खात्यांत जमा झालेल्या पैशांची गुंतवणूक कशी, कुठे करावी यासाठी जिल्हा परिषदेने उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत गावोगावी शिबिरे घेऊन नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा- नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

सध्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्ता, पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पासह विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या जमिनींच्या मोबदल्यात संबंधित शेतकरी, जागा मालकांना निश्चित केलेल्या मूल्यांकनानुसार पैसे दिले जातात. या विकास प्रकल्पांसाठी अधिकचे बाधित होणाऱ्या आणि स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला देण्यात येतो. पैशांचे गैरव्यवहार करणारे अनेक जण सक्रिय होऊन अशा गावांमध्ये जाऊन नागरिकांची दिशाभूल करतात. अनेकदा आर्थिक फसवणुकीचे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अंतर्गत विविध शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. विविध बँकांना सोबत घेऊन आर्थिक गुंतवणुकीचे धडे नागरिकांना गावोगावी जाऊन दिले जाणार आहेत.

हेही वाचा- अंदमानातील बेटाला पुणेकर वीर योद्ध्याचे नाव; परमवीर चक्र विजेते दिवंगत राम राघोबा राणे यांचा सन्मान

अचानक मोठ्या प्रमाणात पैसे आल्याने एवढ्या पैशांचे करायचे काय हा नागरिकांसमोर प्रश्न असतो. या पार्श्वभूमीवर अशा नागरिकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलले आहे. याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू म्हणाल्या, ‘नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची (आरएसईटीआय) मदत घेतली जाणार आहे. ज्या गावांमध्ये प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे, त्या गावांत शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचा- पुणे : फेरफार नोंदी प्रलंबित ठेवल्याने पाच तलाठ्यांना नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा नागरिकांची फसवणूक होते किंवा ते स्वतः पैशांची योग्य गुंतवणूक करत नाहीत. पैसे आल्यानंतर थोडे दिवस त्या पैशांच्या आधारे चांगले जीवन जगतात, कालांतराने संबंधितांना हलाखीचे जीवन जगावे लागते. ही परिस्थिती कुणावरही येऊ नये, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.’ चौकट जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे आला आहे. पैशांची योग्य गुंतवणूक करून कोणी उद्योजक होऊ शकतो. त्या संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पैशांचा योग्य विनियोग आणि गुंतवणूक करण्याबाबत शिबिरांमधून जनजागृती करण्यावर भर असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.