येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला येरवडा पोलिसांनी पकडले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लाख ८७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. सवाराम लाथुराम देवासी (वय ३९, सध्या रा. कोंढवा, मूळ रा. केसरसिंह देसुरी, पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
हेही वाचा- पुणे : पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमाननगर भागात पकडले
देवासी कोंढवा भागातून गुटखा घेऊन नगर रस्त्यावरुन वाघाेलीकडे निघाला होता. येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो निघाल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो अडवला.
टेम्पोची पाहणी करण्यात आली. तेव्हा गोण्यांमध्ये गुटख्याचे पूडे आढळून आले. पोलिसांनी १३ लाख ८७ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र आळेकर, एकनाथ जोशी, सोमनाथ भोरडे, आनंदा भोसले आदींनी ही कारवाई केली.