पिंपरीतील एचए कंपनीतील प्रलंबित प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. आता निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास कोणताच निर्णय होऊ शकणार नसल्याने कामगार धास्तावले असून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दिवसभर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. राजकीय नेत्यांच्या साठमारीत कामगारांचे मरण होत असल्याची भावना कामगार व्यक्त करत आहेत.
कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही, भांडवल नसल्याने कंपनीचे उत्पादन ठप्प आहे, पुनर्वसन योजना रखडली आहे, अशा अनेक दुखण्यांमुळे कंपनी कामगारांचे भवितव्य अंधकारमय आहे. कोणत्याही परिस्थितीत कंपनीला टाळा लागणार नाही, अशी ग्वाही सुळे यांनी दिली आहे. तीन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, केंद्रीय रसायन राज्यमंत्री श्रीकांत जेना यांच्यासमवेतही चर्चा झाली. मात्र, निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने कामगारांमधील अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात, कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर म्हणाले, दीड वर्षांपासून एचए कामगार संघटनेने खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रसायनमंत्री श्रीकांत जेना यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, जेना केवळ पोकळ आश्वासने देत आहेत. वास्तविक कंपनी केंद्राच्या मालकीची असून येथील प्रश्नांबाबत लक्ष घालणे, आर्थिक मदत करणे ही रसायन मंत्रालयाची जबाबदारी आहे. जेना यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या. कंपनीला मदत मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे. या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2014 रोजी प्रकाशित
पिंपरीत एचए कंपनीच्या कामगारांचे पुन्हा आंदोलन
पिंपरीतील एचए कंपनीतील प्रलंबित प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.
First published on: 03-03-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ha company supriya sule agitation salary