Vaishnavi Hagawane Suicide Case Court Updates : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे. या प्रकरणावर गुरुवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी त्यांच्या आशिलांची बाजू मांडत असताना वैष्णवीबाबत अनेक मोठे दावे केले आहेत.
“वैष्णवीच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट्स व इतर आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या”, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. गुरुवारी सुनावणी पार पडल्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी वैष्णवीवर आरोप केले. तसेच पतीने रागाच्या भरात पत्नीला मारणे हा काही कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
“पतीने रागात पत्नीवर केलेला हल्ला कौटुंबिक हिंसाचार नव्हे”
हगवणे कुटुंबाचे वकील म्हणाले, वैष्णवीवर हगवणे कुटुंबाकडून हल्ला झालेला नाही. पतीकडून पत्नीला किरकोळ स्वरुपाची मारहाण होते त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार नाही, किंवा तो छळ नसतो. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आम्ही आज पुणे न्यायालयाला दिला. रागाच्या भरात पतीने पत्नीवर हल्ला केला तर तो कौटुंबिक हिंसाचार किंवा छळ ठरत नाही. छळ होण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं. त्यामुळे पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये असं आमचं म्हणणं आहे”.
वैष्णवीच्या फोनमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या : हगवणेंचे वकील
वकील म्हणाले, “आम्ही (हगवणे कुटुंब) वेळोवेळी वैष्णवीच्या पालकांना जाणीव करून दिली होती की तिच्या मोबाइलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, तिच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडत आहे. एका व्यक्तीबरोबर तिचं चॅटिंग चालू होतं. त्यामुळे वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिचे फोन काढून घेतले. मात्र, त्यामधील चॅट आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही ते चॅट्स न्यायालयासमोर ठेवू. ती व्यक्ती कोण याची माहिती आम्ही तपास अधिकाऱ्यांना दिली आहे”.