अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या कार्यासाठी एमआयटी शिक्षण संस्थेकडून २१ कोटींच्या देणगीची घोषणा करण्यात आली आहे. करोना विषाणू संसर्गामुळे मार्चमध्ये टाळेबंदी लागू केल्यानंतर या संस्थेतील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना ५० टक्केच वेतन देण्यात येत असल्यामुळे या
मोठय़ा देणगीच्या घोषणेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून प्राध्यापक-कर्मचारी यांच्यात नाराजी पसरली आहे.
माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, एमआयटी एटीडी विद्यापीठ, अवंतिका विद्यापीठ, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह येथील सुमारे ७५ हजार विद्यार्थी, ५ हजार शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून राम मंदिरासाठी सुमारे २१ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर श्रीराम मंदिरातील गर्भगृहाच्या निर्मितीसोबतच श्रीराम भारतीय संस्कृती दर्शन ग्रंथालय यांची निर्मितीदेखील करण्यात येणार आहे. या कार्यासाठी संस्थेशी संलग्न असलेल्या विविध हितचिंतकांकडून योगदान देण्यात येईल. तसेच माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे कारसेवा ही कार्य रूपाने करण्याची योजना आहे, अशी माहिती एमआयटी संस्थेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
‘संस्थेकडून एप्रिलपासून एकदाही पूर्ण वेतन देण्यात आलेले नाही. वेतनाच्या ५० टक्केच रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी संस्थेने थेट २१ कोटी रुपये देण्याची घोषणा करणे आश्चर्यकारक आहे. संस्थेने प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देऊन २१ कोटींची देणगी दिली असती, तर ठीक होते. पण असे झालेले नाही. संस्थेतील काही प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना यूजीसी, एआयसीटीई अशा शिखर संस्थांच्या नियमानुसारही वेतन दिले जात नाही,’ अशी माहिती संस्थेतील काही प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
व्यवस्थापनाशी संपर्क साधावा..
प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले ५० टक्केच वेतन आणि राम मंदिरासाठी २१ कोटींच्या निधीची घोषणा याबाबत विचारले असता या विषयावर बोलण्यास एमआयटी व्यवस्थापनाकडून नकार देण्यात आला. तसेच ज्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत प्रश्न आहेत, त्यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले.
कर्मचारी नाराज..
गेल्या चार महिन्यांपासून ‘एमआयटी’त दिल्या जाणाऱ्या निम्म्या वेतनाबाबत संस्थेतील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. असे असताना येथील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून राम मंदिरासाठी सुमारे २१ कोटी देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत.
