एकमेकांची भिन्न जात माहीत असूनही अनोळखी उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यांनी लग्न केले. जातींना तिलांजली देणाऱ्या या विधायक विचारासाठी दोन्ही कुटुंब एकत्र आले आणि त्यांनी धुमधडाक्यात मुलांचे लग्नही लावून दिले. परंतू, लग्नाला काही महिनेच झालेले असताना त्यांच्यात भांडण सुरू झाले. ते इतके विकोपाला गेले की थेट एकमेकांच्या जातीपर्यंत पोहोचले. त्यामुळे एका विधायक विचारालाच तिलांजली दिली गेली. मुलीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनघा आणि वेदांत (नाव बदललेली आहेत) यांचा गेल्या वर्षी आंतरजातीय विवाह झाला. तत्पूर्वी ते दोघं एकमेकांना ओळखतही नव्हते मात्र, विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवरुन त्या दोघांचे मनोमिलन झाले. दोघेही उच्च शिक्षित असून ते हिंजवडीतील वेगवेगळ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर आहेत. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. वेदांत हा व्हाट्सअॅपवर मैत्रिणीसोबत नेहमी बोलत असे त्याला अनघाचा विरोध होता. दरम्यान, अनघाच्या वाढदिवसादिवशी वेदांतने तिला शुभेच्छा दिल्या नाहीत, यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले.

दरम्यान, वेदांत गोवा येथे पर्यटनासाठी एकटा जात असे, यावरूनही दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वेदांतने अनघाला मारहाण करीत शारिरीक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आईला सोबत घेऊन आपल्याला मारहाण केल्याचेही अनघाने फिर्यादीत म्हटले आहे. वेदांत अनघाच्या आईशी बोलताना ‘मी तुम्हाला सभ्य समजत होतो. पण तुम्ही तर फारच घाणेरडे कनिष्ठ जातीचे निघालात (पत्नीच्या जातीचा उल्लेख करत) तुम्हाला मी तुमच्या जातीची लायकी दाखवून देतो, असे म्हणत शिवीगाळ करीत त्याने पत्नीचा आणि सासूचा अपमान केला, असा प्रकार अनेकदा घडल्याचे अनघाने तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर अखेर २८ वर्षीय अनघाने हिंजवडी पोलिसात पती वेदांत, सासू, सासरे, दीर, मामा, मावशी यांच्याविरोधात अट्रॉसिटी कायद्यांतर्गत हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.