लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शहरातील फेरीवाले, स्टॉलधारकांनी हातगाडीसह सोमवारी महापालिकेसमोर चक्काजाम आंदोलन केले. प्रशासनाकडून होत असलेल्या जप्तीच्या कारवाईचाही आंदोलकांनी निषेध केला.

नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, गणेश जगताप यामध्ये सहभागी झाले होते. मोरवाडी चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. मोरवाडी चौक ते महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला. फेरीवाल्यांना परवाने द्या, निश्चित जागा द्या, अन्यकारक कारवाई त्वरित थांबवा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

आणखी वाचा-मद्यपी वाहनचालकांना १० हजारांचा दंड अन् परवानाही होणार रद्द

महापालिकेकडून एकतर्फी आणि कायदा झुगारून कारवाई सुरू आहे. फेरीवाल्यांना लक्ष्य केले जात आहे. बोगस सर्वेक्षण रद्द करावे. कृष्णानगर चौकातील बेकायदेशीर हॉकर झोन रद्द करावा. -काशिनाथ नखाते, अध्यक्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ

हॉकर झोन करण्याबाबतच्या जागा फेरीवाल्यांनी सुचवाव्यात. याबाबत आयुक्तांसोबत बैठक घेतली जाईल. कारवाई शिथिल करून फेरीवाल्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. -प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका