– कृष्णा पांचाळ

आज जागतिक एड्स दिन आहे. आजही आपल्याकडे ‘एड्स’ या गंभीर आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना वेगळी वागणूक दिली जाते. परंतू, काही व्यक्ती अशाही आहेत ज्या त्यांना समजून घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरतरं एक सामान्य व्यक्ती एड्सग्रस्त व्यक्तीशी विवाह करणे शक्यच नाही, अशी आपली ठाम समजूत असते. मात्र, प्रेम ही एक अशी भावना आहे जी आपली ही समजूतही खोटी ठरवू शकते. कारण, पिंपरी-चिंचवड शहरातील श्रेयसने एड्सग्रस्त सोनालीशी (दोघांची नावे बदलली आहेत) प्रेमविवाह करीत एका उदाहरणाद्वारे समाजामध्ये आदर्श घालून दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत गोपनीय पद्धतीने एड्सग्रस्त व्यक्ती उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून गोपनीय ठेवली जाते. अगदी त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांनाही याची माहिती दिली जात नाही. एड्सग्रस्त व्यक्तीला समाजाने दूर करू नये एवढाच यामागचा उद्देश.

एखाद्या एड्सग्रस्त तरुणीशी विवाह करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण असाच बहुतांश लोकांचा समज आहे. परंतु, त्याला श्रेयस अपवाद ठरला आहे. श्रेयस आणि सोनाली या दोघांनी पाच वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला. वरवर ही सामान्य गोष्ट वाटत असली तरी यामध्ये सोनाली एड्सग्रस्त आहे. मात्र, तरीही प्रेमासाठी श्रेयसने सोनालीबरोबर विवाह केला. गेली पाच वर्षे झाली हे दोघेही एकत्र सुखाने संसार चालवत आहेत. विशेष म्हणजे त्यांना एक गोंडस मुलगी देखील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली आणि श्रेयस हे दोघेही उच्च शिक्षित असून अशा विचित्र परिस्थितीमुळे त्यांच्या विवाहला अनेक अडथळे आले. मात्र, त्यावर मात करीत दोघांनी प्रेम विवाह केला. सुरुवातीला श्रेयसने एड्सग्रस्त तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा कोणालाही विश्वासच बसत नव्हता. यावरून त्याच्या कुटुंबात वाद देखील झाले. अखेर श्रेयसने सोनालीसोबत विवाह करून आयुष्यभर साथ द्यायचे तिला दिलेले वचन पाळले. आपल्या या कृतीतून श्रेयसने समाजात एक आदर्श घालून दिला आहे. एड्सवर समुपदेशन करणाऱ्या राजश्री नरळे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना ही माहिती दिली.

अशा प्रकारचे कठोर पाऊल सहसा कोणी उचलत नाही. मात्र, प्रेम आणि विश्वासच हे तडीस नेऊ शकतो हे या दोघांनीही सिद्ध करुन दाखवले आहे.