पिंपरी: पिंपरी पालिकेतील आरोग्य विभागातील ६ सहायक आरोग्य अधिकारी, २२ आरोग्य निरीक्षक, २७ सहायक आरोग्य निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय सेवानिवृत्त होत असून त्यांचा पदभार उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयाकडील कामकाजासाठी आवश्यकता असल्याचे कारण देत आरोग्य विभागातील बदल्यांचे आदेश प्रशासक तथा पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार, कुंडलीक दरवडे, तानाजी दाते, बाबासाहेब कांबळे या सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडे नव्या क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, शांताराम माने, महेश आढाव, राजू साबळे यांच्याकडे सहायक आरोग्य अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. श्रीराम गायगवाड, सतीश पाटील, सुधीर वाघमारे, राजू बेद या मुख्य निरीक्षकांची इतर क्षेत्रीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. याशिवाय २२ आरोग्य निरीक्षक, २७ सहायक आरोग्य निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी बदली रद्द करण्याचे प्रयत्न करू नयेत, ते मान्य केले जाणार नाहीत, असे याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.