पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात काही रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते. हीच परिस्थिती पुन्हा या आठवड्यात असून, शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक होऊन उपाययोजनांची केवळ घोषणा झाल्याने प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती ‘जैसे थे’ आहे.

‘पुणे आता अलिबागचा किनारा बनला आहे. त्याचा पत्ता हिंजवडी टप्पा दोन, आयटी सिटीच्या शेजारी आणि गोंधळाच्या नजीक असा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बहुदा आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना ‘किनारा तुमच्या घरापर्यंत’ अशी सुविधा द्यावयाची असावी,’ असा टोमणा या परिस्थितीबाबत ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’ने मारला आहे.

हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यावरून शासकीय यंत्रणांवर टीकेची झोड उठली होती. आयटी पार्कचे रुपांतर यंत्रणांनी वॉटर पार्कमध्ये केल्याची टीका करण्यात आली होती. यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह (एमआयडीसी) सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या उपाययोजना करण्यासाठी त्यांनी १५ जूनची अंतिम मुदत दिली होती. मात्र, त्यानंतरही आयटी पार्कमधील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत आहे. या पाण्यातून वाहने वाट काढत आहेत.

हिंजवडीतील मेगापोलीस गृहनिर्माण संकुलातील रहिवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आमच्या समस्यांकडे शासकीय यंत्रणा, नेत्यांनी तातडीने लक्ष द्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर आयटी पार्कला भेडसावणाऱ्या रस्ते आणि कचऱ्याबाबतच्या समस्याही त्यांनी मांडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटी पार्कमधील नागरिकांच्या समस्या

  • खड्डेमय आणि चिखलाने भरलेले रस्ते
  • वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर
  • वायू प्रदूषणात सातत्याने वाढ
  • टँकरमाफियांकडून नागरिकांची लूट
  • तुंबलेल्या सांडपाणी वाहिन्या
  • सगळीकडे पडलेले कचऱ्याचे ढीग
  • कंपन्यांतून सांडपाणी थेट बाहेर
  • बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे
  • हद्दीच्या वादामुळे शासकीय यंत्रणांची टाळाटाळ
  • हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोच्या कामास विलंब

आधीप्रमाणे आताही पाऊस पडल्यानंतर रस्त्यांवर पाणी साचत आहे. पीएमआरडीए आणि एमआयडीसीकडून गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या तात्पुरत्या उपाययोजनांमुळे साचणाऱ्या पाण्याची पातळी आता गुडघ्यापर्यंत आली आहे. दीर्घकालीन उपाययोजना नसल्याने परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही.- पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र