दक्षिण गुजरात ते कर्नाटकच्या किनारपट्टीलगत कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने मुंबई, ठाणे परिसरासह कोकणात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला.

दरम्यान, कोकण विभागातील पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहणार असून, कोकणनजिकच्या मध्य महाराष्ट्रातील पट्टय़ातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडय़ातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र असल्याने गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर होता. हा पट्टा आता कोकण किनारपट्टीकडे सरकला आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. या कारणांमुळे दोन दिवसांपासून मुंबई परिसरासह संपूर्ण कोकण विभागात पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली.

महाराष्ट्रात सध्या मराठवाडय़ातच पावसाचा जोर कमी आहे. इतर सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने घाटक्षेत्रातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण आणि या विभागातील मुंबई परिसरात शुक्रवारीही जोरदार पाऊस पडला होता. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारीही (४ जुलै) पावसाचा जोर कायम राहिला. शनिवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबई (कुलाबा) ६६ मि.मी, तर सांताक्रुझ येथे १११ मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबईत गेल्या २४ तासांत १७० मि.मी., मालवण १९०, मि.मी., त्याचप्रमाणे वेंगुर्ला १५० मि.मी., दापोली १४ मि.मी. ठाणे, गुहागर, कुडाळ, चिपळूण, देवगड, पेडणे, राजापूर, सावंतवाडी येथे १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.

शनिवारी मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ८२ मि.मी पाऊस झाला. गगनबावडा, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातही हलक्या पावसाची नोंद झाली. विदर्भात बुलढाणा आणि चंद्रपूरमध्ये चाळीसहून अधिक मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाडय़ात शनिवारी दिवसभर मोठय़ा पावसाची नोंद झाली नाही.

राज्यभर पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ ते ७ जुलै दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. कोकणात पावसाचा सर्वाधिक जोर असणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात मोठय़ा पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ात पावसाचा आंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ातही हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे.