पिंपरी : वेळ दुपारची…ठिकाण हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीचे आवार … अचानक हेलिकॉप्टरचा आवाज … सर्वांची आकाशाकडे नजर … काही क्षणांत जमिनीपासून काही अंतरावरून लष्करी वेषातील कमांडो हेलिकॉप्टरमधून रोपच्या सहाय्याने उतरले आणि परिसरात काही दहशतवादी कृत्य तर घडले नाही ना, या शंकेने आयटी पार्कमधील नागरिकांमध्ये भीती पसरली. मात्र, काही वेळातच हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी मोकळा श्वास सोडला.

अतिरेकी हल्ल्यासारख्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये पोलिस, सुरक्षा यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील समन्वय तपासण्यासाठी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) कमांडो, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांमार्फत मॉकड्रिल राबविण्यात आले.

बुधवारी दुपारी हिंजवडी आयटी पार्कमध्ये आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज येऊ लागला. काही वेळेतच इन्फोसिस कंपनीच्या आवारात हेलिकॉप्टर आले. जमिनीपासून काही अंतरावर असताना हेलिकॉप्टरमधून रोपच्या सहाय्याने एकामागोमाग एक कमांडो खाली उतरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही वेळातच एनएसजी कमांडो, पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारीही सुसज्ज वाहनांसह दाखल झाले. जवानांनी परिसराची वेढा घालून झडती सुरू केली.

कमांडो हत्यारांसह तैनात असल्याचे दृश्य पाहून उपस्थित आयटी कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अचानक वाढलेल्या या बंदोबस्तामुळे चर्चा सुरू झाली. अनेक आयटी कर्मचारी घाबरले. गोंधळामुळे इन्फोसिसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गोंधळ निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले, मात्र काही वेळातच ही घटना केवळ मॉकड्रिल होती, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिल्याने सर्वांनी मोकळा श्वास सोडला.

इन्फोसिस परिसरात ‘मॉकड्रिल’ घेण्यात आले. सरावांद्वारे अतिरेकी हल्ल्यासारख्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील समन्वय तपासला जातो. नागरिकांनी घाबरू नये. ही केवळ सुरक्षा चाचणी होती, असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.