पिंपरी : माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुजबळ चौकातील हिंजवडी-वाकड या पुलावर दुचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दुचाकीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून होणाऱ्या समस्या कमी होण्यासाठी हा प्रयोग राबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेमध्ये दुचाकी वाहनांना पुलावर जाता येणार नाही. वाहतूक पोलिसांकडून या निर्णयाची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस उपस्थित राहून दुचाकी वाहनांना बाजूला करत आहेत. यामुळे मोटार व इतर प्रवासी वाहनांना उड्डाणपुलावर विनाअडथळा जाता येऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे म्हणाले, ‘उड्डाणपूल अरुंद आहे. उड्डाणपुलावर फक्त चारचाकी वाहनांना परवानगी दिल्यास वाहतूककोंडी टळेल. पहिल्या दिवशी काही प्रमाणामध्ये दुचाकी नेहमीप्रमाणे पुलावर जात होत्या. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दुचाकीचालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निश्चितच वाहतूककोंडी कमी होईल.

दुचाकींसाठी पर्याय काय?

वाकड बाजूकडून हिंजवडीला जाणाऱ्या दुचाकीचालकांना डावीकडे वळून भुयारी मार्गातून वळून इच्छितस्थळी जाता येईल. हिंजवडी बाजूकडून वाकडला जाणाऱ्या दुचाकीचालकांना डावीकडे वळून भुयारी मार्गातून जाता येणार आहे.

पोलिसांनी मागवल्या सूचना

दुचाकीबंदीच्या निर्णयावर कोणाला काही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भुजबळ चौकातील हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयात किंवा चिंचवडमधील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात सूचना जमा करता येणार आहेत.