पिंपरी : राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञाननगरीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाकड-हिंजवडी मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी तीन मार्गिका केल्या जाणार आहेत. यासाठी रस्त्यात असलेले दुभाजक काढले जाणार आहेत. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी वाकड आणि हिंजवडी येथे पाहणी दौरा केला. यापूर्वी केलेल्या पाहणीत आयुक्तांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्याबाबत आढावा घेऊन सध्याच्या वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील, विशाल गायकवाड, महापालिकेचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अधिकारी सुनील पवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, सुनील कुऱ्हाडे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, राहुल सोनवणे, सचिन लोंढे, सचिन गुणाले यावेळी उपस्थित होते.
भोसरी-वाकड बीआरटी आणि औंध-रावेत बीआरटी रस्त्याने वाकडमार्गे वाहने मोठ्या प्रमाणात हिंजवडीच्या दिशेने येतात. यामुळे हिंजवडीत येणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वी या मार्गावरून भुजबळ चौकातील उड्डाणपुलावर जाणाऱ्या दुचाकी वाहनांना सकाळी आणि संध्याकाळी प्रवेशास मनाई केली आहे. आता या मार्गावर आणखी बदल करून सकाळी, गर्दीच्या वेळी वाकड-हिंजवडी मार्गावर तीन मार्गिकांवर वाहतूक केली जाणार आहे. सायंकाळी, हिंजवडी-वाकड मार्गावर तीन मार्गिकांवर वाहतूक केली जाणार आहे. यासाठी रस्त्यात असलेले दुभाजक काढले जाणार आहेत. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. तसेच, रस्त्यामध्ये ठिकठिकाणी ‘साइनबोर्ड’ लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
हिंजवडीतील पर्यायी रस्त्यासह अपूर्ण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत. सकाळी वाकड ते हिंजवडी आणि संध्याकाळी हिंजवडी ते वाकड या मार्गावर तीन मार्गिकांवरून वाहतूक करण्याबाबत प्रायोगिक तत्त्वावर बदल केला जाणार आहे. त्यासाठी रस्त्यातील दुभाजक काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त
विवेक पाटील यांनी सांगितले.
हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या भागातील कामे पूर्ण करण्यावर भर दिला असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अधिकारी सुनील पवार यांनी सांगितले.