scorecardresearch

‘पुरुषोत्तम’चा ऐतिहासिक निकाल ; पात्र एकांकिकेअभावी करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय

सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांतही पात्र कलाकार नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकेही कोणालाही जाहीर केली नाहीत.

‘पुरुषोत्तम’चा ऐतिहासिक निकाल ; पात्र एकांकिकेअभावी करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा यंदा ऐतिहासिक निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला. तसेच, सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांतही पात्र कलाकार नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकेही कोणालाही जाहीर केली नाहीत.

करंडकासाठी पात्र एकांकिका नसली तरी सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेस जाहीर झाले आहे. या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नसला तरी पाच हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या ‘भू भू’ या एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक तर, शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ या एकांकिकेस तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक जाहीर झाला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही कोणताही पात्र नसल्याने जाहीर करण्यात आले नाही.

हेही वाचा : चायनीज स्टॉल चालवून राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा ; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बेरोजगारी व महागाईविरोधी प्रतिकात्मक आंदोलन

वैयक्तिक पारितोषिकांमध्येही वैयक्तिक अभिनय नैपुण्यासाठीचा नटवर्य केशवराव दाते करंडक, वाचिक अभिनयासाठी देण्यात येणारा पुरुषोत्तम जोशी व यशवंत स्वराभिनय करंडक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला देण्यात येणारा नटश्रेष्ठ गणपतराव बोडस करंडक कोणालाही देण्यात आला नाही. मात्र, या बक्षीसांसाठी सनी पवार, तन्वी कांबळे आणि प्रतीक्षा शेलार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना करंडक मिळणार नसला तरी बक्षीसांची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा : अमूल डेअरीच्या उत्पादनांची वितरण एजन्सी देण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

भरत नाट्य मंदिर येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अंतिम फेरीतील एकांकिका सादरीकरणानंतर रविवारी रात्री निकालाची घोषणा करण्यात आली. अंतिम फेरीसाठी पौर्णिमा मनोहर, परेश मोकाशी आणि हिमांशू स्मार्त यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (२३ सप्टेंबर) ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या हस्ते भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Historic results of purushottam karandak decision not to award trophy to any team pune print news tmb 01

ताज्या बातम्या